दिवाळीपूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन द्या : रमेश पडवाळ यांची शासनाकडे मागणी
कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी वेतन वेळेवर द्या -पडवाळ
( सुधाकर चौधरी संपादक -)
वाशिम
राज्यात 18 ऑक्टोबर 2025 पासून दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील आनंद, आपुलकी आणि एकतेचा सण मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन 21 ऑक्टोबरपूर्वीच आदा करावे, अशी मागणी इब्टा प्राथमिक व माध्यमिक संघटना वाशिम तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने केली आहे.
या मागणीसंदर्भात जिल्हाध्यक्ष रमेश पडवाळ यांनी सांगितले की, “शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडतात. त्यांचेही कुटुंब असते, सण-उत्सव साजरे करण्याचा त्यांनाही अधिकार आहे. त्यामुळे शासनाने वेळीच पावले उचलून दिवाळीपूर्वी वेतनाची कार्यवाही करावी.”
सणासुदीच्या काळात अनेक गरजा व खर्च लक्षात घेता वेतन उशिरा मिळाल्यास कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण येतो. त्यामुळे शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशीही भावना शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment