कर्तव्यनिष्ठेचा गौरव : लघु वृत्तपत्रांच्या वतीने जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक व समाजसेवकांचा भावपूर्ण सत्कार
वाशिम (वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी)
| आकांक्षित जिल्ह्यात विकासाची गंगा अविरत वाहती ठेवण्यासाठी झटणारे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस., जिल्ह्यातील आरोग्य सेवेला राज्यात उच्च दर्जा मिळवून देणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे आणि समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे निलेश सोमाणी यांचा लघु वृत्तपत्र "पिंगलाक्षी एक्सप्रेस" व "पहाटवारा" परिवाराच्या वतीने शुक्रवारी (दि. ४ जुलै) त्यांच्या कार्यालयात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्ह्यात अवघ्या ४० दिवसांत तब्बल ४० हजार जलतारे निर्माण करून भूजल पुनर्भरणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी पार पाडण्यात आली. या उल्लेखनीय उपक्रमाची "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये नोंद झाली असून, ही कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
दुसरीकडे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिल कावरखे यांनी आपल्या कार्यकुशलतेने वाखाणण्याजोगी आरोग्यसेवा उभी करून, वाशिम जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्थेला राज्यात मानांकनाच्या शिखरावर पोहोचवले आहे. ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान अमूल्य ठरले आहे.
समाजसेवक निलेश सोमाणी हे केवळ माणसांसाठी नव्हे, तर मुक्या प्राण्यांसाठीही सेवाभावाने कार्य करणारे व्यक्तिमत्व. संवेदनशील पत्रकारिता, गोरगरीबांसाठी तत्पर सेवा आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी विविध उपक्रमांमधून कार्यरत असलेल्या सोमाणी यांना यापूर्वी अनेक शासकीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.
या तिघांचाही सत्कार पत्रकार गजानन बानोरे व संदीप पिंपळकर यांच्या हस्ते पिंगलाक्षी देवीची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन लघु वृत्तपत्रांच्या वतीने मोठ्या उत्साहात व कृतज्ञतेच्या भावनेने पार पडले.
या सत्कार सोहळ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपस्थित व्यक्तिमत्वांचा गौरव केला.
Comments
Post a Comment