आयुष्य खूप छोटं आहे – भांडत नका बसू! सुधाकर चौधरी

वाद नको, संवाद हवा!"

"आयुष्य खूप छोटं आहे, भांडत नका बसू" — ही ओळ ऐकली की नकळतच अंतर्मनात विचारांचे वादळ उठते. खरंच, हे आयुष्य क्षणभंगुर आहे. कधी, कुठे, कोणाचा शेवट होईल याचा नेम नाही. आणि म्हणूनच, हे क्षण, हे नाते, ही माणसं — यांचं मोल समजून घेतलं पाहिजे.

आजच्या धकाधकीच्या युगात माणसं एकमेकांपासून दूर जात चालली आहेत. अहंकार, गैरसमज, अभिमान, आणि 'मीच बरोबर' ही वृत्ती — यामुळे नाती कोमेजत आहेत. अनेकदा आपण रागाच्या भरात नको ते बोलतो आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. पण त्याऐवजी वेळेत प्रेमाने, आपुलकीने संवाद साधला तर वाद टाळता येतो, नातं वाचवता येतं.

"मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी बोला" — या ओळीत एक खोल तत्त्वज्ञान आहे. एखादी व्यक्ती हयात असताना तिला आपुलकीची, प्रेमाची, साथीतली जाणीव करून दिली तर ते नातं खरंच अमर होतं.

कधीकधी आपण नात्यांचं ‘टॅगिंग’ करतो — आई-वडील, भाऊ, बहिण, मित्र, जवळचे, लांबचे... पण खरं पाहिलं तर नातं नावाने नव्हे, वागणुकीने ओळखलं जातं. एक परकेसारखी वाटणारी व्यक्ती आपली होऊन जाते आणि आपले म्हणवणारे कधी परके होतात. या उलथापालथीत जो आपुलकीनं, गोड बोलून, समजून घेतो — तोच माणूस आयुष्यभर लक्षात राहतो.

"नातं आपलं कोणतं आहे महत्त्वाचं नाही, प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही?"

आपल्याला दुसऱ्याच्या चुका लगेच दिसतात. पण स्वतःच्या चुकांकडे आपण कितीदा नजर टाकतो? सतत चुकीचा शोध घेत राहिलो, तर सुख हरवतं. मनाला राग, द्वेष, अहंकार यांच्या साखळीत बांधून ठेवलं की हास्य, आनंद, समाधान या गोष्टी दूर पळतात. म्हणूनच, थोडं विसरून, थोडं क्षमा करून, थोडं गोड बोलून नात्यांना पुन्हा फुलवता येतं.

"जिभेवर साखर ठेवा, होणार नाही वाद..."

भांडण, वाद, कुरबुरी, रुसवेफुगवे — हे आयुष्याचा भाग आहेत, पण तेच आयुष्य होऊ नये. जिथे संवाद असेल, तिथे वाद राहणार नाहीत. जिथे समजून घेणं असेल, तिथे गैरसमज टिकणार नाहीत.

आज आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडतो — कोण बरोबर? कोण चूक? पण त्या हिशोबात अनेकदा ‘माणूसपण’ हरवतं. काही नात्यांची गणितं ‘प्रेमाच्या पाटीवर’ मांडली पाहिजेत.

"प्रत्येक क्षण जगून घ्या, घालवू नका मोका"

आपल्या नात्याचं मॉडेल कसं असावं? — तर ते एल.आय.सी.सारखं! "जिंदगी के साथ भी, और जिंदगी के बाद भी!" म्हणजेच हे नातं इतकं गहिरं असावं की जीवनात त्याचा आधार वाटावा, आणि आपल्याच्या अनुपस्थितीतसुद्धा आठवणीत प्रेमाचा श्वास राहावा.


शेवटी एवढंच...

नातं टिकवणं हे ‘अभिमान’ ठेवून नव्हे, तर ‘मन’ ठेवून शक्य होतं.
जगणं छोटंसं आहे, ते गोड केल्याशिवाय काही उरत नाही.
मनातून क्षमा करा, प्रेम द्या, संवाद साधा.
कारण...
"आयुष्य खूप छोटं आहे... भांडत नका बसू!"

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी



Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू