सरकारी दवाखान्यात जीवाशी खेळ ! - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मातेला इन्फेक्शन"


प्रसूतीत झालेल्या हलगर्जीमुळे महिलेला इन्फेक्शन; ‘कापूस काढा’ म्हणणाऱ्या डॉक्टरांविरोधात संतप्त तक्रार – मालेगाव व मंगरुळपीरचा चार्ज एकाच डॉक्टरकडे; रुग्णालयात मनमानी कारभार सुरूच!

मंगरुळपीर (जि. वाशीम), ता. १८ जून – मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या अमानुष हलगर्जीपणामुळे एका महिलेला गंभीर संसर्ग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पारवा येथील देवानंद गायकवाड यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिस ठाण्यात थेट तक्रार दाखल करत दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

गायकवाड यांची पत्नी २३ मे रोजी प्रसूतीसाठी मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. २६ मे रोजी घरी सोडल्यानंतर तिच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. तीव्र वेदना आणि अस्वस्थतेची तक्रार असतानाही डॉक्टरांनी “तब्येत ठिक आहे, काळजी करू नका” असे थातुरमातुर उत्तर देऊन जबाबदारी झटकली. मात्र, जेव्हा करंजा येथील खासगी डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले – टाकलेले टाके व्यवस्थित न तपासता, त्यावर लावलेला कापूसच काढण्यात आलेला नव्हता! त्यामुळे गंभीर इन्फेक्शन झाले होते.

'कापूस काढणे तुमचे काम आहे' – निर्लज्ज उत्तर!

जेव्हा गायकवाड यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा त्यांना मिळालेले उत्तर राग अनावर करणारे होते – “कापूस काढणे हे तुमचे काम आहे!” ही प्रतिक्रिया म्हणजे वैद्यकीय व्यवस्थेची झालेली थट्टाच म्हणावी लागेल. प्रसूतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत रुग्णासोबत अशी बेफिकिरी म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळच!

चार्ज एकाच डॉक्टरकडे; दवाखान्यात बेधडक मनमानी!

सदर ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी हे सध्या मालेगाव येथे कार्यरत असून मंगरुळपीरचा कार्यभार देखील त्यांच्याकडेच आहे. परिणामी दोन्ही ठिकाणची जबाबदारी एका डॉक्टरकडेच असून मंगरुळपीर रुग्णालयात शिस्त नावालाच उरली आहे. वरिष्ठांची अनुपस्थिती आणि कर्मचाऱ्यांची ढिसाळ वृत्ती यामुळे रुग्णालयात ‘कोणी राजा नाही आणि दरबारी मनमानी’ असा अराजक कारभार सुरु आहे.

रुग्णांसोबत उद्धट भाषा 

या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचाराऐवजी उद्धटपणाचे आणि अरेरावीचे तोंडी चाबक झेलावे लागत आहेत.  अशा भाषेत रुग्णांशी बोलणं हे येथे नेहमीचंच झालं आहे. सरकारी दवाखाना म्हणजे सेवा देण्याचं स्थान असताना, येथे नागरिकांची अवहेलना, अपमान आणि उपेक्षा केली जाते, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

डॉक्टरांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा – गायकवाड यांची आग्रही मागणी

या संपूर्ण प्रकारामुळे गायकवाड कुटुंबीय मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जात आहेत. त्यांनी संबंधित डॉक्टर व प्रशासनावर तातडीने निलंबनाची कारवाई करून इतर रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही, याची हमी देण्याची मागणी केली आहे.

हे वैद्यकीय सेवेचे मंदिर आहे की मनमानीचा बाजार?

हा प्रश्न आता संपूर्ण मंगरुळपीर तालुक्याला पडलेला आहे. सरकारी रुग्णालये ही गोरगरिबांची शेवटची आशा असते, मात्र येथे सुरू असलेली बेपर्वाई ही फक्त निष्काळजी नव्हे, तर गुन्हा आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, ही जनतेची एकमुखी मागणी आहे.



Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू