"आणीबाणी — भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग"— प्रा. सुधीरजी घोडचर यांचे प्रतिपादन


मानोरा, ता. २५ जून"२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. हुकूमशाही पद्धतीने घेतलेल्या या निर्णयामुळे संविधानाचे उल्लंघन झाले, नागरिकांचे मौलिक हक्क हिरावून घेण्यात आले आणि विरोधकांवर अन्यायाचा मारा करण्यात आला," असे ठाम प्रतिपादन प्रा. सुधीरजी घोडचर यांनी केले.

भारतीय जनता पार्टी मानोरा मंडळाच्या वतीने आयोजित “आणीबाणी – काळा दिवस” या विशेष कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते श्री. महादेवराव ठाकरे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे व मासूपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांचा समावेश होता.

प्रा. घोडचर यांनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या २१ महिन्यांच्या काळातील घटनांचे चिकित्सक विश्लेषण करताना सांगितले की, “या काळात ‘मिसा’सारख्या कायद्याचा गैरवापर करून कोणतीही चौकशी न करता राजकीय विरोधकांना व सर्वसामान्य नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादण्यात आले, प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादली गेली.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महादेवराव ठाकरे यांनी या काळात झालेल्या अमानुष छळाचा आणि नागरिकांना झालेल्या हालअपेष्टांचा उल्लेख करत, लोकशाही टिकवण्यासाठी सतत सजग राहण्याची गरज अधोरेखित केली.

प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “आणीबाणी हा केवळ ऐतिहासिक विषय नसून लोकशाही मूल्यांचा गाभा समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या घटनेचा अभ्यास चिकित्सक दृष्टीने करणे आवश्यक आहे.”

कार्यक्रमात भाजपाचे डॉ. अविनाश लोथे, राजू देशमुख, डॉ. भास्कर धामणीकर, डॉ. सुहास देशमुख, मनोज खडसे, निखिल अंभोरे, डॉ. सचिन राठोड, प्रताप डांगे, महेंद्र राठोड, नामदेव पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनील काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. महावीर धाबे यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू