घरकुलासाठी फासेपारधी कुटुंबाचा आक्रोश – "आत्महत्येच्या उंबरठ्यावर..."
कुडाच्या घरात राहण्याची वेळ; शासनाच्या आश्वासनांना कंटाळून तीव्र आंदोलनाचा इशारा
वाशिम, ११ जून – "गेल्या अनेक वर्षांपासून कुडाच्या घरात राहतोय... घरकुलासाठी अर्ज करूनही आश्वासनांशिवाय काही मिळालं नाही... आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलोय," – असं हताश वक्तव्य करत मालेगाव तालुक्यातील वसारी येथील फासेपारधी समाजातील सौ. उज्वला शंकु पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून शासनाच्या उदासीनतेविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.
वसारी येथील रहिवासी पवार कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय गावठाणातील सर्वे नं. १३८ मधील जागेवर कुडामाती व ताट्याचं घर बांधून राहतात. त्यांच्याकडे १९९५-९७ सालचा नमुना १ ई, २०११-१२ च्या ग्रामपंचायतीच्या करपावत्या, तसेच जागेच्या दंड भरण्याचे शासकीय पुरावे असूनही, त्यांच्या घरकुलाच्या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
२०१६ साली सौ. लता संतोष पवार यांच्यासह १२ महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं. २०२४ मध्ये लेखी पत्र देऊन महिन्याभरात प्रस्ताव सादर केला जाईल, असं सांगितलं गेलं. परंतु आजही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ७/१२ फेरफार आणि मंजूर लेआउट आदेश सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, पण एक वर्ष उलटूनही कुठलाही निर्णय झाला नसल्याचं निवेदनात नमूद आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही घरकुलासाठीची मागणी पूर्ण झाली नाही, तर फासेपारधी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सौ. पवार यांनी दिला आहे.
फासेपारधी समाजासाठी शासन किती संवेदनशील?
घरकुलासारख्या मूलभूत गरजेसाठी दशकानुदशके झगडणाऱ्या वंचित समाजासाठी शासनाचे धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा दृष्टीकोन यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. फक्त आश्वासनं पुरेशी नाहीत, आता कृती हवी – असा ठाम सूर या निवेदनातून उमटतो.
Comments
Post a Comment