वाशिम, कारंजात , रिसोड १०० उमेदवारांमध्ये ६५ अपक्ष उमेदवारी माघार प्रक्रियेकडे मतदारांचे लक्ष
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
---------------------------------------
वाशिम : विधानसभा निवडणुकीत
जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १०० उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर, ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीत कोण माधार घेणार आणि निवडणूक रिंगणात किती जण राहणार, याचा फैसला .
रिसोड, वाशिम व कारंजा या तिन्ही मतदारसंघांत यावेळी उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला. महायुती तसेच महाविकास आधाडीकडून तिकिट न मिळालेल्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून युती, आघाडीसमोर आव्हान निर्माण केले. बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू असून, यामध्ये कोणाला कितपत यश येते, याचा फैसला आज होणार . यंदाची विधानसभा निवडणूक
वेगळी ठरणारी असून, रिसोडचा अपवाद वगळता वाशिम आणि कारंजा या दोन मतदारसंघांमध्ये उमेदवारांची शक्ती पणाला लागणार आहे.
१०० उमेदवारांमध्ये तब्बल ६५ जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असून, कितीजण माघार घेणार आणि निवडणूक रिंगणात किती उरणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते कायम राहिले तर जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राजकीय पक्षांनी त्यांचे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. दुसरीकडे प्रयत्न करूनही ज्यांना राजकीय पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्यासह ६५ जणांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीत रंगत भरल्या गेली आहे. पक्षात निष्ठावंतांना जागा नाही का असाही सवाल मतदार करत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकमेव रिसोड विधानसभा मतदारसंघात एकूण उमेदवारांचा आकडा १९ आहे. वाशिममध्ये तो दुपटीने (३८) वाढला असून कारंजा मतदारसंघात सर्वाधिक ४३ उमेदवारांचा समावेश आहे.आज ४ नोव्हेंबरपर्यंत त्यातील कितीजण माघार घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दुपारनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप
आज ४ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांना त्यांचे अधिकृत चिन्ह मिळेल, निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हे तयार ठेवली आहेत.
Comments
Post a Comment